“कुटुंबाला प्रेमाचे, संस्कारांचे कुंपण आवश्यक” : सुशील कुलकर्णी
‘‘आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी प्रेमाचे, संस्काराचे कुंपण घराला असणे गरजेचे आहे. घरात मुलांवर लक्ष ठेवणारी पिढी कुटुंबापासून तोडली गेली आहे. कुटुंबातील सुदृढ संवाद लोप पावत चाललेले आहेत,’’ असे मत सुशील कुलकर्णी यांनी मांडले.
महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने परशुराम जयंतीच्या निमित्ताने ‘आमची मुलं सुरक्षित आहेत का?’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरण येथील सावरकर मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने पाच मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही दिली गेली. माझी मुलगी माझा अभिमान या अंतर्गत ज्या एकुलती एक मुली सासू-सासऱ्यांसोबत आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करीत आहेत, अशा मुलींचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास, अभिजित अग्निहोत्री, लेखक विजय शेंडगे डॉ. शरदचंद्र लोहोकरे, माजी नगरसेविका भारती फरांदे, माजी उपमहापौर शैलजा मोरे आदी उपस्थित होते. सचिन बोधनी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शर्वरी येरगट्टीकर, सुभाष फाटक, वृंदा गोसावी, मनीषा नातू, वैदही पटवर्धन, अश्विनी मेहरुनकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.