पिंपरी, 26 नोव्हेंबर 2024: महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे 26/11 मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम संत तुकाराम नगर पोलीस चौकी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात शहीद पोलीस आणि जवानांना फुल अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय श्री कुंभार यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी समाजात पोलिसांची संख्या कमी करण्याचे आवाहन केले. कुंभार सर म्हणाले, “आजच्या काळात समाजामध्ये पोलिसांची संख्या कमी व्हावी, यासाठी प्रत्येक नागरिकाने समजूतदारपणा आणि जबाबदारीने वागले पाहिजे. शिक्षणाचा दर्जा वाढला आहे, तसाच समाजामध्ये आपसी प्रेम आणि मैत्रीची नाती घट्ट व्हायला हवीत. जर असे झाले, तर समाजामध्ये पोलिसांची आवश्यकता कमी होईल.”
कुंभार सरांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “प्रत्येक व्यक्तीने आपल्या आतल्या पोलीसभावनेला जागृत करून नियमांचे काटेकोर पालन करावे, ज्यामुळे समाजात पोलिसांची संख्या कमी व्हावी.”
यावेळी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शहिदांना फुल अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.