महाराष्ट्र ब्राह्मण सभा
ब्राह्मण समाजाच्या पुनरुत्थानासाठी व समाजोन्नतीसाठी आपल्या समाजातल्या कै.ज.ल. आपटे, कै. कृ.भा.चितळे, कै. ज.स. करंदीकर (केसरीचे संपादक), कै. गं.बा. काळे व कै. शं.रा.दाते वगैरे द्रष्ट्याधुरिणांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यासारख्या प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र ब्राह्मण सभा दिनांक ६ जानेवारी १९२६ रोजी स्थापन केली. समाजाला आलेली मरगळ व नैराश्य झटकून टाकण्यासाठी व पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासून शताब्दी वर्ष पूर्तीकडे यशस्वी वाटचाल करताना संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवलेले आहेत.
मामाराव दातेंच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र श्री मुकुंदराव दाते यांनी या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली. महाराष्ट्रभर ब्राह्मण चळवळींची अधिवेशने सुरू झाली जालना, औरंगाबाद, परभणी आणि बीड नंतर पुण्यामध्ये कै. चंद्रकांत जोशी व श्री प्रकाश दाते यांच्या सहकार्याने सन 2008 साली वेदाचार्य श्री घैसास गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली भूगाव येथे साडेचार लाख ब्राह्मणांचे महाप्रचंड असे बहुभाषिक अधिवेशन समर्थपणे व सुयोग्य रीतीने संपन्न केले.
कालौघात समाजमन बदलले आहे, ब्राह्मण समाजाने कात टाकली आहे, समाजसेवेचे आयाम बदलले आहेत व बदलत्या सामाजिक परिस्थितीत नव्याने आपल्या न्याती बांधवांना एक हक्काचे व्याजपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, समाजासमोरील नवनवीन आव्हानांना सकारात्मक ऊर्जेतून तोंड देण्यासाठी पुनश्च एकदा महाराष्ट्र ब्राह्मण सभा नव्या कार्यकर्त्यांच्या सक्षम फळीसह उभी राहिली आहे. या सर्व गोष्टींसह संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार हा महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरही केला. वेगवेगळे आयाम जसे की शैक्षणिक विभाग, सामाजिक विभाग, सांस्कृतिक विभाग, आरोग्य विभाग, महिला संघटन विभाग, धर्मजागरण विभाग असे वर्गीकरण करून रचनाबद्ध कार्यक्रम घेतले गेले.
ब्राह्मण समाजाच्या मूळ जुन्या उद्दिष्टांसह नवीन समाजोपयोगी व समाजही हितैशी धोरणांचा व योजनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही आज महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्रा बाहेरही समाजातल्या प्रत्येक स्तरासाठी काम करणारी सर्वात जुनी अशी एकमेव ब्राह्मण संस्था आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
सध्या संस्था मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा या विभागात नवनवीन कार्यकर्ते, संस्था व हितेच्छुकांची जोडणी करून विस्तारकार्य करत आहे.