पिंपरी, ता. ३ : महाराष्ट्रातील ३० जागा ब्राह्मण समाजाला द्याव्यात, अशी मागणी राज्य महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे आणि आम्ही आपल्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. मात्र, सध्या राज्यात ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची अत्यंत आवश्यकता आहे. राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान ३० जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच चिंचवड, ठाणे, कल्याण- डोंबिवळी या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य वेळी आम्ही त्यांची नावे सादर करू.